Monday 5 February 2018

तुझ्या नसण्यातलं तुझं असणं .....


समुद्रकिनाऱ्यावर बसून बराच वेळ दोघेपण शांतपणे त्या समुद्राला पाहत होते .. तेवढ्यात त्याच्याकडे पाहून 
ती म्हणाली " तुला कधी कळालं की तुझं माझ्यावर प्रेम आहे ते ?"
तो "हे बघ  ,खरं पाहायचं  तर याने काही फरक पडतो का , कधी कुठे  कसं या प्रश्नांना काही अर्थ नाही आता .बस आवडतेस तू मला आणि आहे माझं तुझ्यावर प्रेम ."
ती " नाही तू सांगच मला ,मला माहित आहे सरळ सोप्प उत्तर नाहीच देणार तू . नेहमीसारखं शब्दांच्या गोल-गोल जाळ्यात काहीतरी अवघड असं उत्तर देणार तू मला .. तरीपण मला हवंय उत्तर .. सांग ."
तो "मग एक तर माझं उत्तर . तू माझ्या आयुष्यात यायच्या आधीच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो ."
ती "ए काहीपण सांगू नकोस .. असं कस शक्य आहे ."
तो "खरंच .. तू भेटण्याच्या आधी मी तुलाच तर शोधत होतो .. तू कुठे होती ,तुझं नाव काय होतं ,तू कशी दिसायची ,कशी हसायची ,कशी बोलायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कशी रुसायची ,हे मला नव्हतं माहीत .. पण हो , तुझ्या माझ्या आयुष्यात 'नसण्यामध्ये ' मला कुठेतरी तुझं ' असणं ' जाणवलं होत .. सारखं जाणवायचं माझ्या मनाला की तू आहेस कुठेतरी ,जवळ की दूर ते नव्हतं माहित पण आहेस कुठेतरी एवढं नक्की जाणवतं होत .. मी फक्त वाट पाहत होतो तू माझ्या आयुष्यात येण्याची ..
दिसणाऱ्या अनेक चेहऱ्यांमध्ये मला तुझा भास व्हायचा .. असं वाटायचं की ,हीच तर नाही ना  ती .. हो नंतर निराशा व्हायची कारण ती तू नसायची .. पण तू भेटशील एक दिवस हि आशा नव्हती सोडली .. माझ्या मनाला आपली वाटेल अशी ती साउली नक्की भेटणार असं सारखं वाटत राहायचं .. 
माझा हा कळत-नकळत तुझ्या दिशेने सुरु असलेला प्रवास ,या तुझा शोध घेण्याच्या प्रवासातच मी तुला न पाहताच तुझ्या या दिसण्याच्या ,या हसण्याच्या ,या बोलण्याच्या प्रेमात पडत गेलो .. आणि ते प्रेम आजही आहे .."
एवढं सांगून त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती त्याच्याकडे टक लावून पाहत होती .. 
तेव्हा हलकंसं हसून तो म्हणाला " अवघड आहे ना समजायला .. हे असं आहे बघ माझ्या मनाचं ..समजायला थोडंसं अवघड पण थोड साधं सरळ आणि सोप्प सुद्धा आहे बरं .."
ती अजुन पण काहीच न बोलता त्याच्याकडे फक्त पाहत होती .. 
तेव्हा त्याने विचारलं " मग मॅडम ,भेटलं का तुम्हाला तुमचं उत्तर .."
त्याचा हात हातात घेऊन ती म्हणाली " भेटलं तर नाही  .. पण मला समजलं .. तुझं उत्तर आणि तुझं मन सुद्धा " 
त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन ती पुन्हा शांतपणे त्या मावळतीच्या रंगात मावळत जाणाऱ्या समुद्राकडे ,आणि त्या अंधुक होत जाणाऱ्या क्षितिजाकडे पाहत बसली .. ... 




                                                                                       - सुधीर 

5 comments:

  1. अतिशय सुंदर.....after long time..but the best one..writer..

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर.....after long time..but the best one..writer..

    ReplyDelete
  3. खूप सुंदर..खुप आवडलं

    ReplyDelete