Friday 26 August 2016

हसणं ..

कधी गालातल्या गालात 
तर कधी मोकळेपणानं 
असं तुझं ते गोड हसणं
आणि ते हसणं पाहून 
माझ्या मनाचं सारखं सारखं फसण ...


असं हे हसणं .. आणि माझं त्या हसण्यात फसण .. 
पण खरच कमाल असते ना या हसण्याची .. नातं निर्माण करायची आणि तेवढ्याच ताकदीने ते नष्ट करायची जादू या 'हसणं' नावाच्या गोष्टी मध्ये असते .. दोघांच्या हसण्याची लय जुळली कि तिथे जुळतो मैत्रीचा एक धागा दुसऱ्या धाग्याला .. आणि जेव्हा कोणाचंतरी गोड असं ते हसणं अगदी मनापासून आवडायला लागत ना तेव्हा सुरुवात होते एका नाजूक अशा प्रेमाच्या नात्याला .. तर दुसरीकडे जेव्हा कोणी कोणावर तरी हसतं तेव्हा मात्र ग्रहण लागत त्या नात्याला .. म्हणजेच काय तर कोणीतरी कोणावर हसलं म्हणून नाती तुटतात सुध्दा ,आणि कोणालातरी कोणाचतरी हसणं आवडलं म्हणून नाती जुळतात सुद्धा ..

सर्वांचं हसणं तसं पहायला गेलं तर असत वेगळं .. कुणाचं हसणं असतं एकदम गोडं ,तर कुणी एकदम मोकळेपणानं हसतं .. कोणाचं हसणं असत थोडं लाजरं ,अगदी गुपचूप .. तर कोणी हसत अगदी बिनदास्त ,सगळ्या जगाला ऐकू जावं अशा आवाजात .. कोणी कोणी हसताना अक्षरशः सर्व दात दाखवतात ,तर काहीजण फक्त समोरच्याला दातांच्या मुख दर्शनाचा लाभ देतात .. कोणी हसताना सर्व अंग गदागदा हलवून हसत तर कोणी हसताना गालावर एक छान अशी खळी पाडून शोभतं .. हसण्याच्या अशा वेगवेगळ्या तऱ्हा .. तरी एक गोष्ट मात्र नक्की .. हसणं हे नेहमी सुंदरच असत ,फक्त ते मनापासून असायला हवं .. 
                     माझ्या मते तर या जगातली कोणतीही व्यक्ती जेव्हा अगदी मनमोकळेपणानं ,अगदी मनापासून हसते ना त्या वेळेला ,त्या क्षणी ती जगातली सर्वात सुंदर व्यक्ती दिसत असते .. मग ते अजूनही दात न आलेल्या लहानशा इवल्याशा बाळाचं हसणं असो किंवा वय आणि दात दोन्ही निघून गेलेल्या जख्खडं म्हाताऱ्याचं हसणं असो .. 

पण या हसण्याला आपण भीतीच आवरण घालून आजकाल खोटं खोटं हसत आहोत .. कोणीतरी माझ्याकडे पाहून हसेल या भीतीने आपण खरं तर मोकळेपणानं हसण्याच्या या गंमतीपासून दूर जातोय .. माहित नसलेल्या भविष्याची चिंता ,सोबतच्या लोकांचं चुकीचं वागणं ,यशापयश मिळवताना आलेली प्रतिकूल परिस्थिती या असल्या गोष्टी कुठेतरी तुमचं ते हक्काचं हसणं तुमच्यापासून हिरावून घेतायेत ,किंबहुना तुम्ही त्या हिरावून घेऊ देताय .. तेव्हा सर्व भीती सर्व चिंता सोडून फक्त मनमोकळं हसा ,अगदी मनापासून हसा .. मनापासून हसणाऱ्यांना पावलोपावली आनंद देणाऱ्या गोष्टी दिसतील ,पण जर या हसण्यालाच जर भिऊन राहिलो तर मात्र पावलोपावली फक्त चिंताच दिसेल .. पुढचा क्षण ना तुम्हाला माहित ना मला ,आणि ज्याला माहित आहे तो देव ,तो तर वरती बसून तुमच्या या वागण्याकडे पाहून स्वतःच हसत असेल ..

           तेव्हा सर्व चिंता ,सर्व काळजी सोडून द्या आणि बस मनापासून .मनमोकळं हसा .. मग पहा आयुष्य किती सुंदर दिसू लागत ते .. आणि मग तुमचंही मन समोरच्याच्या हसण्यात कसं फसू लागत ते ..
                             

                                                                                   - सुधीर