Sunday 17 January 2016

ते पुस्तक ....

      

  

बऱ्याच दिवसांपासून काहीतरी चुकल्यासारखं वाटत होत .. 
                      माझा स्वतःला समजून घ्यायचा ,स्वतःला जाणून घ्यायचा शोध तर सुरूच आहे ,आणि या शोधामध्ये ,या प्रवासात मला साथ देत आहेत माझ्या आयुष्यात येत असलेली हि पुस्तके .. खरतर सध्या ,मनातल्या प्रश्नांची उत्तर शोधण आणि शक्य तेवढ हे आयुष्य ,हे जगण समजून घेण याच उद्देशाने मी पुस्तक वाचत असतो .. काही पुस्तक या कसोटीवर खरी उतरतात तर काही नाही उतरत .. 
          म्हणूनच हा प्रवास ,हा स्वतःला समजून घ्यायचा प्रवास ;नकळतपणे अशा पुस्तकांच्याच शोधाचा प्रवास बनत चालला आहे .. जरी 'युगंधर' ने या पुस्तक वाचनाच्या प्रवासाची सुरुवात झाली असली तरी "Johnathan Livingston Seagull" या पुस्तकाने इंग्रजी पुस्तकांचा दरवाजा उघडला माझ्यासाठी ,आणि मग मात्र अनेक पुस्तक आली आयुष्यात .. काही मराठी तर काही इंग्रजी .. मागे काही दिवसांपूर्वी वाचलेल्या पाउलो कोएलो च्या "Like the Flowing River " या पुस्तकाने तर मला अक्षरश मोहून टाकल ,पण ते पुस्तक वाचून झाल्यावर मात्र पुढंच आवडेल अस पुस्तक लवकर नाहीच आलं आयुष्यात .. बरेच दिवस गेले ,मी त्याची येण्याची वाट पाहत होतो .. वेगवेगळी पुस्तक घेतली हातात ,नेटवर शोधली आणि अनेक दुकानं पण धुंडाळली ,पण आवडेल अस पुस्तक नाही आलं माझ्यासमोर .. 
                   तेव्हा एक विचार आला मनात  ,जस योग्य वेळेला योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येते तसच योग्य वेळेला योग्य पुस्तक आपल्या आयुष्यात येत नसेल ना  .. पण त्यासाठी या पुस्तकांचा पण शोध घ्यावा लागतो बर का ,इकडे तिकडे नजर फिरवावी लागते .. मग जाऊन कधी कोणत्या क्षणी कोणत पुस्तक समोर येईल आणि ते वाचून तुमच आयुष्य बदलून जाईल हे सांगता येत नाही .. 
                      अशा शोधात असतांनाच व.पु.काळे यांच 'आपण सारे अर्जुन 'हे पुस्तक मिळाल ,ज्याने मला स्वतःमध्ये अडकवून ठेवल .. वाचताना नकळत मी माझ्याच मनातच हरवत गेलो .. हे पुस्तक म्हणजे या प्रवासातला महत्वाचा टप्पा ठरणार यात शंका नाही .. 
        आणि हे वाचून झाल्यावर पुन्हा शोध सुरु होईल ,पुन्हा नजर इकडे तिकडे फिरेल ,शोधात त्या पुढच्या पुस्तकाच्या ..   


                                                                                          - सुधीर (9561346672)

Sunday 10 January 2016

शोध ....



शोध ..
तसा हा शब्द दिसायला फार छोटा आणि सोपा आहे ,तरी या शब्दात आपल अख्खं आयुष्य सामावलेलं असत .. 
          आपल्या आयुष्यात आपण नेहमी कशाचा ना कशाचा शोध घेतच असतो .. मग ते कळत किंवा नकळत घेत असो ,पण आपल मन हा 'शोध' घेत असतच .. काही जणांना जाणवत कि ते काय शोधत आहेत आणि ते त्या शोधाच्या मार्गावर प्रवासाला निघतात सुद्धा ,पण बरेच जण आपण काय शोधत आहोत हेच न कळल्याने ,त्या 'शोधा'च्या शोधातच पूर्ण आयुष्य घालवतात .. 
          एक व्यक्ती एकच गोष्ट शोधत असतो असही नाही बर का ,तर एकाच व्यक्तीच्या आयुष्यात अनेक शोध सुद्धा असू शकतात .. कधी सुखाचा शोध तर कधी प्रेमाचा शोध ,कधी कुणाच्या आधाराचा शोध तर कधी मायेच्या दोन शब्दांचा शोध .. कधी यशाचा शोध तर कधी त्या यशाकडे नेणाऱ्या मार्गाचा शोध .. चालता चालता थकलो तर विसाव्याचा शोध तर कधी तात्पुरत्या विसाव्यापेक्षा कायमच्या त्या आसऱ्याचा शोध .. कधी स्वतःमध्ये डोकावून स्वतःचा शोध ,तर कधी आकाशाकडे पाहत त्या परमेश्वराचा शोध .. 
        या अशा अनेक शोधांमुळे या जगण्याला काही उद्देश मिळतो ,एवढच नव्हे तर याच शोधामुळे आपल्या आयुष्यात निर्माण होतात नवनवीन नाती ,आपल्या या शोधाच्या प्रवासात येउन जुळतात नवीन माणसे .. प्रेमाच्या शोधामुळे मिळतात मित्र मैत्रिणी ,यशाच्या शोधत मिळतात गुरु आणि मित्र ,विसाव्याच्या शोधत मिळतो आपल्याला आपला परिवार ,तर आसऱ्याच्या शोधत आपल्याला गवसतात आयुष्यभर साथ देईल अशी माणस .. 
       हा शोध आत्तापर्यंत चालूच होता ,आजही चालूच आहे आणि यापुढेही चालूच राहील .. माझ्या आयुष्यातला हा शोध ...     

                                                                           - सुधीर