Friday 29 August 2014

चेहरा ..

             
                 चेहरा .. या चेहऱ्यांची आणखी एक फार मोठी  गम्मत असते .जन्मल्या जन्मल्या आपण आईचा चेहरा पाहतो आणि गंमत म्हणजे नंतर ते बाळ काही महिने तरी फक्त त्याचा आईचाच चेहरा ओळखते ,आणि अनोळखी चेहरे दिसताच ते रडू लागते .म्हणजे जन्मापासूनच आपण अगदी नकळतपणे चेहऱ्यांचे ओळखीचे आणि अनोळखी असे आपल्या मनात प्रकार पाडत असतो .
            आपण रोजच्या आयुष्यात जगताना ,आजूबाजूला आपण ओळखीचे चेहरे दिसतात का ते पहायचा प्रयत्न करत असतो .मग ते शाळा ,कॉलेज असो व रस्त्यावर सिग्नलला थांबलेलो असताना असो वा कुठेतरी प्रवासाला जात असू ,आपण पाहत असतो कि कुठे एखादा ओळखीचा चेहरा दिसतोय का ते .    
            पण हे ओळखीचे चेहरे खरच ओळखीचे असतात का ? अनेकदा अस होत कि हे ओळखीचे चेहरे सुद्धा अनोळखी वाटू लागतात आणि काही काही अनोळखी चेहरे का कुणास ठाऊक पण ओळखीचे वाटू लागतात .कित्येकदा असे प्रसंग घडतात कि आपल्याला गरज असते तेव्हा आपण आपल्याला ओळखीचे वाटतात अशा चेहेऱ्याकडे आशेने पाहतो ,कारण आपल्याला विश्वास असतो कि हि माणसे मला नक्की समजून घेतील ,मला मदत करतील .परंतु होते वेगळेच , ओळखीचे हे चेहरे साथ सोडून देतात आणि अनोळखी सारखे वागतात आणि तेव्हा कुठूनतरी एखादा अनोळखी चेहरा येतो आणि तोच आपल्याला मदतीचा हात पुढे करतो .आणि त्याच अनोळखी चेहऱ्यासोबत पुढे आपले संबंध दृढ होतात आणि यातूनच मैत्री ,प्रेम निर्माण होते .
           तरीसुद्धा हे मन अनोळखी चेहऱ्यांवर सहजासहजी विश्वास ठेवायला तयार होत नाही .जेव्हा कधी ओळखीचा आणि अनोळखी चेहरा यात निवडायची वेळ येते तेव्हा आपण नक्की ओळखीच्या चेहऱ्याचीच निवड करतो .कारण आपण अनोळखी चेहऱ्यांना आपलस करायला भीत असतो .भलेही त्यांचा आणि आपला संबंध काही क्षणांपुरता असो तरीसुद्धा आपण त्या चेहर्यांकडे अविश्वासानेच पाहतो .म्हणून तर प्रवासात भेटणार प्रत्येक माणूस चोर वाटतो ,रस्त्यावर भेटणारा प्रत्येक भिकारी हा दारुडा वाटतो ,मदत मागणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला फसवीच वाटते आणि मैत्रीचा हात पुढे करणारी प्रत्येक व्यक्ती हि वाईट दृष्टीची वाटते .
         म्हणून माझ्या मते ,जगण्याची खरी मजा असते ती या अनोळखी वाटणाऱ्या चेहऱ्यांवर कधी कधी विश्वास टाकून पाहण्यात .एखाद्या अनोळखी चेहरऱ्याला आपणहून मदतीचा हात देण्यात .मग पहा ,त्या अनोळखी चेहऱ्यांचे आयुष्य ,त्यांच्या समस्या या अनोळखी न राहता तुम्हाला त्या नक्की ओळखीच्या वाटू लागतील ,आणि जाणवेल कि अरेच्चा आपल आयुष्य सुद्धा यांच्यासारखाच आहे .
      तेव्हाच खर तर प्रेमाची भावना  निर्माण होऊ शकते .प्रेम या जगाबद्दल ,प्रेम या समाजाबद्दल कारण अनोळखी चेहऱ्यांना आपलस करण्याच्या या स्वभावालाच तर प्रेम म्हणतात नाही का .. 
                                                                                         
                                                                                                            - सुधीर