Sunday 29 September 2013

Intelligent Heroes

             
            मला आवडणार एक छान वाक़्य आहे ." जर एखाद्या देशातल्या वा समाजातल्या तरूणांच मन जाणून घ्यायचं असेल तर त्या पिढीचे आवडीचे गाणे ऐका '" . म्हणजेच तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या ,त्यांना आवडणाऱ्या गाण्यातून त्यांच्या मनात डोकावता येत . हेच वाक़्य माझ्या मते सिनेमा आणि मालिकानाही लागू होते .
             परवा माझ्याकडे डाउनलोड केलेले 'शेरलॉक' या मालिकेचे एपिसोड पाहत होतो . तेव्हा हा विचार मनात आला कि आपल्याकडे अशा मालिका का नाही बनवल्या जात ,ज्यात नायक-नायिकांच्या तथाकथित Six pack पेक्षा  बुद्धिमत्तेवर भर दिला जातो .वरच्या 'शेरलॉक' या मालिकेत नायकाच्या दिसण्यापेक्षा त्याची बुद्धिमत्ता दाखवण्यावर भर दिला आहे . नायक एकदम सडपातळ आणि एकदम उंच दाखवलाय तर elementary या मालिकेत नायक जवळपास टकलाच दाखवलाय ,हेच आपल्याकडे होईल का ? अर्थात वर सांगितलेल्या नायकांची अभिनय क्षमता उत्तमच आहे आणि आपल्याकडेही उत्तम अभिनय करणाऱ्यांची कमी नाहीये ,पण आपण मागे पडतो ते पाहण्याच्या view मध्ये . 
           हॉलीवूड चे खूप सिनेमे असे आहेत ज्यात नायकाचे जे पात्र असते त्याच्या बुद्धीच्या क्षमतेवर पूर्ण सिनेमा आधारित असतो . भलेही तो सिनेमा 'काल्पनिक' या वर्गवारीत बसत असेल तरीपण त्यातल्या intelligent नायकाच्या पात्राचा प्रभाव साहजिकच तिथल्या तरुण पिढीवर पडतच असणार .
Nikolas Cage चा 'National treasure 1&2' , Robert douny Jr चा 'sherlock holmes 1&2' ,Dannial Crag चा 'Casino Royal ' ,Brad pitt चा 'Ocean eleven 1,2&3' ,Tom cruise ची 'Mission impossible series' ,Matt damon ची  'Bourne series' ,Dennis Quad चा 'Vintage point' अशी काही सिनेमांची यादी . तर Benedict cumberbatch चा Sherlock , Johnny lee miller चा elementary , तसेच Criminal minds , The mentalist , Psych या काही मालिका . या सर्वात आणि अजूनही खूप सिनेमांमध्ये व मालिकांमध्ये नायकाच्या सुंदर पिळदार दिसण्यापेक्षा त्याच्या अभिनयावर भर दिला आहे ,नायकाच्या पात्रात त्याच्या मारधाड करण्यापेक्षा त्याच्या बुद्धीच्या जोरावर संकटांवर मात करण्यावर भर दिला आहे . 
             उलटपक्षी आपल्याकडे रावडी राठोड ,दबंग ,एजन्ट विनोद ,देवदास ,रांझना ,खिलाडी ४२० यासारख्या सिनेमातून आपण कसले आदर्श उभे करत आहोत तरुणांपुढे . कदाचित यामुळेच आज चंगळवाद पसरत चालला आहे आणि नवीन कल्पना ,नवीन आयडीया यांच्यापेक्षा फक्त शरीरप्रदर्शन ,खोटे व तथाकथित high standards याचाच विचार बहुतांश तरुण करताना दिसत आहेत . आपले भारताचे मौल्यवान आदर्श विसरून ,बुद्धिवादाला बाजूला सारून फक्त बाह्यशरीरावादाला आपण प्रोत्साहन देत आहोत . अर्थात special 26 ,सरफरोश ,तारे जमीन पर यासारख्या सिनेमातून वा सत्यमेव जयते ,नवीन महाभारत यासारख्या मालिकांमधून बुद्धिवादाला प्राधान्य दिल जातंय पण हे प्रमाण खूपच कमी आहे . त्यामुळे आतातरी हि दृष्टी बदलली पाहिजे ,फक्त box office किंवा टीआरपी साठी जो मसालाबाजी चा बाजार मांडला आहे तो कमी झाला पाहिजे आणि पात्रातील नायाकांद्वारे आपले तरुण प्रेरणा घेऊ शकतील असे दर्जेदार आणि बुद्धिप्रामाण्यावादी नायक दाखवले गेले पाहिजेत . 

Monday 9 September 2013

तारुण्याचा लढा

       
  
            "डायना न्याड " , हिने नुकताच एक जागतिक विक्रम केला . तिने फ्लोरिडाची सामुद्रधुनी पोहत पार केली जे आत्तापर्यंत कोणालाही जमले नव्हते . तिने पार केलेली हि सामुद्रधुनी ११० मैल लांब आहे आणि ती पार करायला तिला ५२ तास आणि ५४ मिनिट लागले . आणि हि सामुद्रधुनी पार करताना तिने शार्कपासून संरक्षण करण्यासाठी वापरतात तसा कुठलाही पिंजरा किंवा कवच वापरलं नाही .
           आता वरच वर्णन वाचनाऱ्या  कुणालाही वाटेल कि डायनाचे वय साधारणपणे २० ते ३० वर्षे यादरम्यान असेल . पण winners ना एक सवय असते ती म्हणजे बाकीच्या जगाला ते सतत आश्चर्यचकित करत असतात . डायनाच वय तब्बल ६४ वर्ष आहे . होय ६४ वर्ष . ज्या वयात किंबहूना त्याआधीच खुपजण आयुष्य जगायचं कंटाळलेले असतात किंवा कुठल्यातरी आजारात खितपत पडलेले असतात आणि मरण यायची वाट पाहत असतात , त्या वयात डायनाने हा विश्वविक्रम केला .
           एवढ्यातच तिची गोष्ट संपत नाही , डायनाने स्वतः एका मुलाखतीत हे सांगितलय कि ,ती जेव्हा लहान होती तेव्हा तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर लैंगिक शोषण केले होते , आणि तरुण असताना तिच्या पोहण्याच्या प्रशिक्षकाने तिच्यावर अतिप्रसंग केला होता . समाजाच्या या इतक्या भयानक अत्याचारानंतर सुद्द्धा डायनाने हार नाही मानली आणि तीच स्वप्न पूर्ण करायची जिद्द नाही सोडली .वयाच्या ६० व्या वर्षापासून तिने हि सामुद्रधुनी पार करायचं स्वप्न उराशी बाळगून त्या द्रुष्टीने प्रशिक्षण सुरु केले . तेव्हा अनेकजणांनी तिच्या वयाकडे बघून तिला वेड्यात काढले , तेव्हा ती शांतपणे म्हणत असे कि ,मला जगातल्या बाकीच्या ६० वयाच्या लोकांना व सर्व तरुणींना हे दाखवून द्यायचंय कि स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधीच उशीर होत नसतो ,फक्त तुम्ही ठरवण्याची आणि न हारता लढायची गरज आहे .
         खरच , या ६४ वर्षाच्या तरुणीला व तिच्या या लढ्याला माझा मनापासून सलाम ……


Monday 2 September 2013

Mango girls

            
                        बिहार मधल्या बागलपुर जिल्ह्यात असलेले 'धरहरा' हे एक छोटस गाव . पण या गावात एक अशी प्रथा पाळली जाते जिच्यापासून खर तर संपूर्ण भारताने आदर्श गेण्याची गरज आहे . सध्या भारतात कमी होणारी मुलींची संख्या (लिंगगुणोत्तर) तसच भ्रूणहत्येचं अतिशय वाढणार प्रमाण , या खर तर शरमेन मान खाली लावायला लावणाऱ्या गोष्टी आहेत , पण या कालोखामध्ये काही आशेचे किरण दिसतायेत आणि धरहरा गाव हे त्यापैकी एक .
                     या गावात १९६१ पासून एक प्रथा अस्तित्वात आली आणि ती आजतागायत चालू आहे . येथे प्रत्येक जन्मणारया मुलीचे स्वागत १० फळझाडे आणि त्यातल्या त्यात आंब्याची झाडे लावून केले जाते . आज जिथे भारतात इतक्या अनिष्ट प्रथा आणि रूढी परंपरेच्या नावाखाली अस्तित्वात आहेत तिथे धरहरा गावातली हि प्रथा नक्कीच आशादायी वाटते .
                   या एका प्रथेतून अनेक सामाजिक समस्यांना सामोरे जाण्याची उत्तरे मिळतात . एक तर , मुलीच्या जन्माचं स्वागत करणे हीच सर्वात छान आणि खरच प्रेरणादायी गोष्ट घडते , त्यात फळझाडे लावून तिच्या जन्माच स्वागत करणे म्हणजे यातून पर्यावरणासाठी , निसर्गरक्षणासाठी आपणही काहीतरी देण लागतो हि भावना पण वाढीस लागण्यास मदत होते . आज झाडे लावणे आणि मुलीला जन्म देणे जणू काही पापच आहे अस समाज वागतोय , पण या छोट्याशा गावाने दोन्ही गोष्टीना एकत्र आणून खूप छान संदेश दिला आहे .
                   आज या ८,००० लोकसंख्येचा गावात तब्बल २०,००० फळझाडे आहेत . या प्रदेशातील हे गाव म्हणजे एक छोटीशी हिरवळीची फळबागच बनल आहे . झाडं लावण्याचा अजून एक फायदा म्हणजे तीच झाडं मोठी झाल्यावर त्यांच्यापासून मिळणारी फळे , त्यापासून मिळणारे लाकूड हे त्या त्या कुटुंबाला आर्थिक आधार देऊ शकते . जणू ती जन्मणारी मुलगीच अप्रत्यक्षपणे त्या घराला आर्थिक आधार देतेय , आणि आजकाल मुलींना 'बोझ' समजणाऱ्या समाजाला यातुन छान संदेश जातोय .
                   या गावाच्या या प्रथेची दखल जागतिक पातळीवरहि घेतली गेलीय , कुणाल शर्मा आणि रोबर्ट कार यांनी या गावावर शोर्ट फिल्म बनवलीय तीच नाव "Mango girls" , आणि हि फिल्म अमेरिकेतील SanDiago या शहरात एका मोहत्सवात दाखवली जाणार आहे .
                 आपल्या पूर्ण देशात ,आपल्या महाराष्ट्रात गावागावात हा pattern  राबवला जायला पाहिजे . पण सध्या जे आपल्या हातात आहे ते करूया , आपल्या आजूबाजूचा लोकांना हि सुंदर कल्पना सांगा ,काहीजणांनी जरी ऐकल तरी नक्कीच एक छान सुरुवात होईल , आणि स्वतःपासून सुरुवात करायचीय त्यामुळ मी तर ठरवलंय कि माझ्या मुलीच्या जन्माचं स्वागत मी १० फळझाड लावूनच करणारे .

Sunday 1 September 2013

आस्तिक-नास्तिक

                                        आज मला लोकांमध्ये असणाऱ्या एका फार मोठ्या गैरसमजाविषयी बोलायचंय . तो म्हणजे आस्तिक आणि नास्तिक यातला फरक . आपण बहुतेकजण नाही तर सर्वच जण असच मानतो कि जो देव मानतो तो 'आस्तिक ' आणि जो देव मानत नाही तो 'नास्तिक' . माझ्या मते हि साफ चुकीची संकल्पना आहे . एक खूप सोपी संकल्पना आहे या दोन शब्दांमागची .
                                    दोन बेडूक होते जे एका विहिरीत राहत असत . त्यांच्यासाठी ती विहीर म्हणजेच संपूर्ण जग होते . त्या विहिरीबाहेर एखाद जग पण असू शकेल याची त्या दोघांनाही अजिबात कल्पना पण नव्हती . ते दोघ त्यांच्या छोट्याशा जगात मजेत राहत होते . एके वर्षी पावसाळ्यात खूप पाउस पडला ,इतका पडला कि ती विहीर अगदी काठोकाठ भरली . तळातून त्या दोघांना पाण्याचा वर अचानक खूप उजेड दिसायला लागला म्हणून उत्सुकतेपोटी ते पोहत पोहत वर आले आणि हळूच थोडस डोक वर कडून त्यांनी पाहिलं , तर सगळीकडे लख्ख प्रकाश , आजूबाजूला नुसती हिरवीगार झाड आणि थोडे चार पायांवर चालणारी प्राणी त्यांना दिसू लागले . त्यांचा पाण्यातल्या जगापेक्षा हे जग खूप नवीन होत  . त्यातला एक बेडूक म्हणाला "काय मस्त दिसतंय ना हे सर्व !चल ना बाहेर उडी मारू  आणि पाहू कस आहे हे नवीन जग ". दुसरा बेडूक त्याला वेड्यात काढत म्हणाला "मरायचं का तुला ? हे सगळ नवीन जग काहीतरी भयंकर प्रकार दिसतोय मला ,चल आपण आपल तळाशी जाऊ आणि उरलेलं आयुष्य सुखान जगू इथ ". शेवटी न राहावल्यान पहिल्या बेडकाने बाहेर उडी मारलीच .पण तो दुसरा बेडूक तळाशी निघून गेला .त्याचं वर्षी खूप मोठा दुष्काळ पडला आणि त्या विहीरातल पाणी एकदम आटत आल . त्या आतल्या बेडकाचा श्वास गुदमरायला लागला ,शेवटी हताश होऊन त्याने तिथेच प्राण सोडला , आणि तो पहिला बेडूक विहिरीच्या काठावरून हे सर्व पाहत होता पण तो पण काहीच करू शकत नव्हता .
                                  तुम्हाला वाटेल त्या बेडकांचा आणि आस्तिक-नास्तिक असण्याचा काय संबंध ? तर संबंध आहे . मी त्या विहीराबाहेर पडणाऱ्या ,नव जग शोधायला निघालेल्या आणि उजेडाला न घाबरता त्या लख्ख प्रकाशामागाच्या सत्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करणाऱ्या बेडकाला 'आस्तिक ' म्हणेन तर त्या अंधारात खितपत पडलेल्या ,पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर म्हणजेच देवाच्याच  कृपेवर राहणाऱ्या बेडकाला 'नास्तिक' म्हणेन .
                                     देव मानणारा असेल किंवा देव न मानणारा असेल , आस्तिक म्हणजे तो मनुष्य ज्याच्यासमोर नवीन काही आलं मग ते नवं ज्ञान असो किवा आयुष्यात दिसणारा नवा मार्ग असो किंवा नवं काहीही असो , तो ते खुल्या मनानं स्वीकारतो , त्याचा समोर घडणाऱ्या गोष्टींवर विश्वास आहे आणि हा विश्वास आंधळा नाही तर त्या घडणाऱ्या गोष्टीमागच्या कारणावर हि विश्वास आहे . एखाद्या लहान मुलासमोर ज्याला भूत माहित नाही त्याचासमोर तुम्ही एकदा अंधारात जाऊन आलात तर त्या मुलाच मन लगेच हे स्वीकारत कि अंधाराला घाबरायचं काही कारण नाहीये .
                                        पण नास्तिक मनुष्य त्याच्यासमोर कुणीही कितीही सत्य मांडले ,सत्याच्या कितीही बाजू मांडल्या , कितीही डोक आपटलं तरी तो ते सत्य स्वीकारत नाही कारण त्याचा मनात त्यान ठरवलेल्या गोष्टींपेक्षा वेगळी गोष्ट आली तर तो ते नाही स्वीकारू शकत . तोच माझ्या मते नास्तिक .
                                        देवाला न मानणाऱ्या माणसांचा एक मुद्दा असतो कि यांनी देवाला पाहिलं नाही किंवा त्यांना देव कधीच जाणवला नाही , तरीपण ते अस्तिकच असतात  कारण त्यांच मन कारणाशिवाय ची गोष्ट सत्य म्हणून स्वीकारायला तयार होत नाही आणि हा सत्य जाणून घायचा ध्यासच त्यांना आस्तिक बनवतो . त्यामुळ मी अस नक्की म्हणू शकेन कि प्रत्येक देव न मानणारा मनुष्य 'अस्तीक'च असतो .पण प्रत्येक देव मानणाऱ्या व्यक्तींबद्दल अस नाही म्हणता येत . जे कर्मठ धर्मांध लोक असतात ते दुसर कुणाचहि ऐकून घेत नाहीत ,त्यांना जे योग्य वाटत तेच खर आहे आणि तेच एकमेव सत्य आहे अस ते मानतात . माझा त्या परमेश्वरावर ,त्या सर्वोच्च ताकदीवर विश्वास आहे पण पूजा-अर्चा ,कर्मकांड ,यज्ञ-विधी ,ग्रह-ताऱ्यांची दशा यावर विश्वास नसला तरी मी नक्कीच आस्तिक आहे कारण माझ मन खुल  आहे ,येणाऱ्या नव्या ज्ञानासाठी ,नव्या रस्त्यांसाठी ,नव्या दिशा शोधण्यासाठी .
                                          तर तोडून टाका जुनी बंधने जी तुन्हाला पटत नाहीत ,सोडून द्या त्या वाटा ज्यावर तुम्हाला जायची इच्छा नाही ,नव्या वाटा नाव ज्ञान ,नव्या दिशा तुमची वाट पाहतायेत . खरे आस्तिक व्हा आणि सत्याचा ध्यास धरा .