Tuesday 10 March 2020

उच्च हे स्त्रीत्व ..


काल 9 मार्च होता .. 
म्हणजेच जागतिक महिला दिन .. 
काल दिवसभर सर्व वयातील सर्व स्तरातील स्त्रियांना वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता .. 
नेटवरून उधारीवर घेतलेले फोटो, काही छान अशा कविता पोस्ट करून वेगवेगळ्या माध्यमातून आपण कसे स्त्रीचा सन्मान करतो हे दाखवायची चढाओढ लागली होती .. वर्तमानपत्रांमध्ये ' स्त्री ' बद्दल भरपूर असे लेख वाचायला भेटले, वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली काम करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान व त्यांच्या कहाण्या टीव्ही वर पाहायला भेटला... पण हे सर्व काल बघत असताना माझ्या मनात एक साधा प्रश्न आला .. 
खरच किती लोक , खासकरून किती पुरुष , मनात सुप्त पुरुषी अहंकार न आणता , आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्री ला योग्य तो सन्मान आणि वागणूक देतात ???? 
मुळातच,  आम्ही पुरुष उच्च आणि स्त्री ही पुरुषापेक्षा कमी, अशी समजूत असणाऱ्या पुरुषांची संख्या काढली तर थक्क होणारी आकडेवारी समोर येईल ..
किंबहुना , स्त्रियांमध्ये सुद्धा , आम्ही पुरुषांपेक्षा कमीच असतो अशी भावना असते, आणि ही भावना असते म्हणण्यापेक्षा या पुरुषप्रधान संस्कृती मध्ये ही भावना लहान वयापासून त्या मुलींमध्ये भरवली जाते , व नंतर ती त्या स्त्री मध्ये तशीच राहते आयुष्यभर ..
मग आपण का म्हणून शुभेच्छा देतोय स्त्रियांना ..
  1. एकांतामध्ये पत्नीला सन्मान आदर न देता , तिला मनात येतील त्या आई बापावरून शिव्या देणाऱ्या
  2. सासरी गेल्यावर माझे पाय तिकडच्या लोकांनी धुतले पाहिजेत असं म्हणून स्वतःला जावई अर्थात पुरुष म्हणून उच्च समजणाऱ्या जावयाला ,
  3. स्वतः घराबाहेर शंभर ठिकाणी तोंड मारून झाल्यावर सुद्धा पत्नीकडे घरी संशयाने बघणाऱ्या त्या माणसाला,
  4. मला मुलगी नकोय म्हणून स्वतःच्याच हाताने स्वतःच्या 1-2 महिन्यांच्या लेकीचा जीव घेणाऱ्या त्या त्या प्रत्येक पुरुषाला ,
  5. आणि त्याच्या या नकली पुरुषार्थ गाजवण्यात त्याला साथ देणाऱ्या त्या प्रत्येक स्त्रीला मला हेच म्हणायचे आहे की , का साजरा करायचा हा महिला दिंन ..
खर तर हे अख्खं आयुष्यच , एका आई च्या रूपातून एका स्त्री ने आपल्याला दिलं आहे , आणि आपल्याला अख्खं आयुष्य देणाऱ्या त्या स्त्री ला आपण काय देतो तर फक्त एका दिवसाचं कौतुक , एका दिवसाचं सन्मान , तो सुद्धा मनापासून न देता फक्त वरवरचा आणि खोटा खोटा ....
जर आयुष्यात उच्च अस काही करायचं असेल , तर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सन्मानाने वागवा.. मग बघा , तिच्याकडून एवढं प्रेम भेटेल की कशाचीच कमी नाही भासणार ..
प्रत्येक स्त्री , मग ती मुलगी असो वा पत्नी असो वा आई असो वा मैत्रीण असो , ती जन्मतः स्वतंत्र असते .. तिच्या स्वातंत्र्याचा सन्मान करा .. 


आणि हो, स्त्री पुरुष समान आहे अस मी मुळीच मानत नाही .. स्त्री ही पुरुषापेक्षा काकणभर वरतीच असते , हेच सत्य आहे .....


              - सुधीर

Wednesday 16 January 2019

आमच्या मनातलं थोडंसं ..



खरं तर वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोलणं ,गप्पा आणि चर्चा सुरूच असतात आमच्या एकमेकांसोबत ..
उत्तम श्रोती ,आणि कविमन समजून घेणारी ती आहेच .. पण बोलता बोलता एक दिवस अचानक असं समजलं कि चारोळ्या करणारं एक मन सुद्धा दडून बसलं आहे तिच्या मनात .. मग काय .. जमली आमची मेहफिल ..
त्यातलंच थोडंसं हे .. फक्त माझ्याच मनातलं थोडंसं नाही , तर आमच्या मनातलं हे थोडंसं ..

ती : सूर्याची सावली हि प्रत्येकाला दिसते , पण .. कुणी पाहिलीय का रात्रीतली त्या चंद्राची पडलेली सावली ...

मी : चंद्राच्या सावलीला एक वेगळीच किनार असते .. आजूबाजूच्या त्या अंधारात ती पण कुठेतरी हळूच दडून बसलेली असते ...

ती : दडून बसलेल्या सावलीला बघायला लागते फळत तिला प्रेमाने शोधणारी नजर ..

मी : अशी प्रेमाची नजर म्हणजे त्या रोहिणी नक्षत्राची देणी ..
       चंद्र नाही दिसला तरी त्याच्या सावलीला पाहून आनंदाने उजळून जाणारी ती रोहिणी ..
      स्वतःच्या प्रकाशात त्या चंद्राच्या दडून बसलेल्या सावलीला उजेडात आणणारी ती रोहिणी ..



                                                                            - सुधीर & कोमल




Thursday 6 December 2018

हि पाऊलवाट ..



हि पाऊलवाट .. 
तुझ्या आणि माझ्या आयुष्याची हि पाऊलवाट .. 
अनेक वळणावळणांमधून ,कधी वेड्यावाकड्या तर कधी सरळ अशा या वाटेवर सुरु असलेला आपला हा आत्तापर्यंतचा स्वतंत्र असा हा प्रवास ,हि आपली पाऊलवाट ,आता यापुढे एक होईल .. 
आत्तापर्यंत या वाटेवर चालताना उमटत जाणाऱ्या माझ्या एकाकी अशा या पाऊलखुणांना ,यापुढे कायमची साथ मिळेल ती तुझ्या उमटणाऱ्या पाऊलखुणांची ..
आत्तापर्यंतचा हा आपला प्रवास ,हि आपली पाऊलवाट वेगळी अशी होती .. 
तुझा प्रवास तुझ्या वाटेवरती आणि माझा प्रवास माझ्या वाटेवरती सुरु होता ..
या वाटेवर चालताना ,
कधी सुखाच्या शीतल थंडगार अशा सावलीतून चालावं लागलं तर कधी चालता चालता भेटला तो दुःखाचा गडद असा भयाण अंधार .. 
कधी अक्षरशः अस्तित्व हादरवून टाकणार असं एखाद भयानक वळण लागलं तर कधी या मनाला आनंदाच्या चिंब पावसात भिजवून टाकणारं असं वातावरण दिसलं .. 
असंख्य झाडांनी ,असंख्य फुलांनी या प्रवासात आपली साथ दिली ,काही त्या-त्या वेळेला साथ देऊन नंतर वेगळ्या वाटेने निघून गेले तर काही वाटसरू अजुनसुद्धा आपल्यासोबत या वाटेवरचे वाटसरू बनून साथ देत आहेत .. 
या वाटेवर लागणाऱ्या प्रत्येक वळणावर ,तुला आणि मला घ्यावा लागला तो एक निर्णय ,तो हा कि पुढे नेमकं कोणत्या दिशेने जायचं .. 
निर्णय घेताना कधी-कधी पाऊल डगमगल सुद्धा ,कारण प्रत्येक वळण आयुष्याला कुठेतरी घेऊन जाणारं होत हे माहीत होत ,आणि मग भीतीसुद्धा वाटायची ,चुकीचा निर्णय घेऊन चुकीच्या वळणाने गेलो तर ... 
ते निर्णय कधी कधी बरोबर निघाले तर कधी ते साफ चुकलेसुद्धा .. 
पण खरं तर ,बरोबर असो वा चूक ,पण आपण घेतलेल्या त्याच वळणांमुळे ,त्याच निर्णयांमुळे कदाचित आपली हि वेगळी-वेगळी चालणारी पाऊलवाट ,पुढे जाऊन एका सुंदर अशा क्षणी ,एका नकळत अशा वळणावर येऊन एक झाली .. 
आणि म्हणूनच त्या प्रत्येक झाडाला ,प्रत्येक फुलाला ,प्रत्येक उजेडाला आणि प्रत्येक अंधाराला ,प्रत्येक पावसाला आणि अशा त्या प्रत्येक छोट्या-मोठ्या अशा वळणांना ,ज्यांनी आपली हि पाऊलवाट एक करायला ,आपल्याला एक व्हायला कळत-नकळत मदतच केली ,त्या सर्वांना मनापासून धन्यवाद .. 
आणि या पाऊलवाटेवर आपल्या पुढच्या प्रवासासाठी तुला-मला खूप प्रेमळ अशा शुभेच्छा ..



                                                                       - सुधीर 

Sunday 8 July 2018

नातं ..



नातं .. 
मग ते नातं कुठलंही असो .. 
ते हळुवारपणे खुलण्यातच खरी मजा असते ..
पण आजकाल सर्वांनाच घाई झाली आहे .. सर्व गोष्टींची घाई .. 
नातं पटकन तयार व्हावं आणि या पटकन तयार झालेल्या नात्याची वीण मात्र आयुष्यभर टिकावी अशीच अपेक्षा करतात अन इथेच फसतात हि मंडळी ..  
जस प्रत्येक कळी तिच्या कलेकलेने खुलते ,जस प्रत्येक झाड त्याच्या कलेकलेने वाढत ,तसंच या नात्यानासुद्धा कलेकलेने खुलू द्यायचं असत ..
मग असंच खुलता खुलता पुढे जाऊन त्या नात्यात एक घट्ट आणि कधीच न तुटणार बंध तयार होतो , जो कायम राहतो, चिरकाल टिकतो .. 
त्यासाठी पाहिलं ते नातं जुळेल .. मग ते त्याच्या कलेने खुलायला लागेल .. आणि मग त्या नात्याची सुंदर अशी कळी खुलेल .. 
पण त्या नात्याला असं खुलण्यासाठी योग्य वेळ नाही दिला तर ते नातं चिरकाल टिकेलच याची शाश्वती नाही  .. 
म्हणून सावकाशपणे जुळू द्या या नात्यांना .. 
हळुवार असं खुलू द्या या कळीला ..
त्यानंतरच खरं हि कळी जोमाने खुलेल .. 
अन आयुष्यात आनंदाचा , प्रेमाचं सुगंध पसरेल .. 



                                                                                         - सुधीर 

Sunday 10 June 2018

व्यक्त-अव्यक्त ..

                 

               
कधी कधी मला कुतुहूल वाटतं की नेमकं कोण कोणाला व्यक्त करतंय इथे .. मी या शब्दांना व्यक्त करतोय कि हे शब्द मला व्यक्त करत आहेत ..
  खरं तर मन आणि शब्द यांचं नातं व्यक्त-अव्यक्त असं असत .. जेव्हा एक अव्यक्त असतो तेव्हा दुसरा त्याला आपोआप व्यक्त करतो .. जणू काही दोन खूप जवळचे मित्र ,ज्यात एक रागावून रुसून बसला तर लगेच दुसरा त्याला बोलत करायचा प्रयत्न करतो  .. मन आणि शब्दांचं असंच तर आहे अगदी .. मनाविरुद्ध काही घडलं कि हे मन मग स्वतःशीच रुसून बसतं , तेव्हा मग या शब्दांनीच या मनाची मनातल्या मनात समजूत काढावी लागते .. आणि जेव्हा कधी हे शब्दच रुसून बसतात तेव्हा हे मनच स्वतःला आतल्या आत व्यक्त करत राहत .. तेव्हा ओठांवर शब्द जरी येत नसले तरी मनातल्या मनात मात्र विचारांचा अन शब्दांचा भडीमार सुरु असतो ..
  म्हणूनच कधी वाटत कि माझं मनच अव्यक्त आहे आणि हे शब्द त्या मनाला व्यक्त करतात , तर कधी वाटत कि हे शब्दच अव्यक्त आहेत ज्यांना व्यक्त करायचं काम या मनात सतत सुरु असत ..
असा हा खेळ मनाचा आणि या शब्दांचा ..
व्यक्त-अव्यक्त असा हा खेळ ..


                                                                                  - सुधीर     

Sunday 25 March 2018

स्पर्श तुझा ...



तळहात तुझा टेकव 
माझ्या या हातांवर 
पाऊससुद्धा पडेल मग 
    त्या तहानलेल्या फुलांवर  .. 

ओल्या स्पर्शाने तुझ्या 
उजळेल अशी ती रात्र 
आपल्या प्रेमाच्या वर्षावात 
न्हाऊन निघेल ती रात्र .. 

हे आभाळ फाडून चंद्र
सुद्धा येईल साक्षीला 
अन स्पर्श तुझा नि माझा 
     लाजवेल त्या रात्रीला ..  


                                                              - सुधीर 

Monday 5 February 2018

तुझ्या नसण्यातलं तुझं असणं .....


समुद्रकिनाऱ्यावर बसून बराच वेळ दोघेपण शांतपणे त्या समुद्राला पाहत होते .. तेवढ्यात त्याच्याकडे पाहून 
ती म्हणाली " तुला कधी कळालं की तुझं माझ्यावर प्रेम आहे ते ?"
तो "हे बघ  ,खरं पाहायचं  तर याने काही फरक पडतो का , कधी कुठे  कसं या प्रश्नांना काही अर्थ नाही आता .बस आवडतेस तू मला आणि आहे माझं तुझ्यावर प्रेम ."
ती " नाही तू सांगच मला ,मला माहित आहे सरळ सोप्प उत्तर नाहीच देणार तू . नेहमीसारखं शब्दांच्या गोल-गोल जाळ्यात काहीतरी अवघड असं उत्तर देणार तू मला .. तरीपण मला हवंय उत्तर .. सांग ."
तो "मग एक तर माझं उत्तर . तू माझ्या आयुष्यात यायच्या आधीच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो ."
ती "ए काहीपण सांगू नकोस .. असं कस शक्य आहे ."
तो "खरंच .. तू भेटण्याच्या आधी मी तुलाच तर शोधत होतो .. तू कुठे होती ,तुझं नाव काय होतं ,तू कशी दिसायची ,कशी हसायची ,कशी बोलायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कशी रुसायची ,हे मला नव्हतं माहीत .. पण हो , तुझ्या माझ्या आयुष्यात 'नसण्यामध्ये ' मला कुठेतरी तुझं ' असणं ' जाणवलं होत .. सारखं जाणवायचं माझ्या मनाला की तू आहेस कुठेतरी ,जवळ की दूर ते नव्हतं माहित पण आहेस कुठेतरी एवढं नक्की जाणवतं होत .. मी फक्त वाट पाहत होतो तू माझ्या आयुष्यात येण्याची ..
दिसणाऱ्या अनेक चेहऱ्यांमध्ये मला तुझा भास व्हायचा .. असं वाटायचं की ,हीच तर नाही ना  ती .. हो नंतर निराशा व्हायची कारण ती तू नसायची .. पण तू भेटशील एक दिवस हि आशा नव्हती सोडली .. माझ्या मनाला आपली वाटेल अशी ती साउली नक्की भेटणार असं सारखं वाटत राहायचं .. 
माझा हा कळत-नकळत तुझ्या दिशेने सुरु असलेला प्रवास ,या तुझा शोध घेण्याच्या प्रवासातच मी तुला न पाहताच तुझ्या या दिसण्याच्या ,या हसण्याच्या ,या बोलण्याच्या प्रेमात पडत गेलो .. आणि ते प्रेम आजही आहे .."
एवढं सांगून त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती त्याच्याकडे टक लावून पाहत होती .. 
तेव्हा हलकंसं हसून तो म्हणाला " अवघड आहे ना समजायला .. हे असं आहे बघ माझ्या मनाचं ..समजायला थोडंसं अवघड पण थोड साधं सरळ आणि सोप्प सुद्धा आहे बरं .."
ती अजुन पण काहीच न बोलता त्याच्याकडे फक्त पाहत होती .. 
तेव्हा त्याने विचारलं " मग मॅडम ,भेटलं का तुम्हाला तुमचं उत्तर .."
त्याचा हात हातात घेऊन ती म्हणाली " भेटलं तर नाही  .. पण मला समजलं .. तुझं उत्तर आणि तुझं मन सुद्धा " 
त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन ती पुन्हा शांतपणे त्या मावळतीच्या रंगात मावळत जाणाऱ्या समुद्राकडे ,आणि त्या अंधुक होत जाणाऱ्या क्षितिजाकडे पाहत बसली .. ... 




                                                                                       - सुधीर